BIG BREAKING | बारामती पोलिसांच्या त्रासाला कंटाळून १५ ऑगस्टला कुटुंबियांसह आत्महत्या करणार;बिनविरोध नगरसेवक किशोर मासाळ यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….

नगरसेवक किशोर मासाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे बारामती शहरात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बारामती पोलिसांच्या त्रासाला कंटाळून येत्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) आपण आपल्या कुटुंबासमवेत जीवन संपवणार असल्याचा इशारा मासाळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे. पोलिसांच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त करताना, “बारामती पोलीस आपल्यासोबत इंग्रजांसारखे वागत आहेत,” असा थेट आणि गंभीर आरोपही त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

​किशोर मासाळ यांच्या या सनसनाटी पोस्टनंतर स्थानिक प्रशासनासह पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे.यापूर्वी देखील किशोर मासाळ हे आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ते मध्यंतरी चांगलेच चर्चेत आले होते. त्या प्रकरणात त्यांच्यावर राजकीय व कायदेशीर स्तरावर मोठी टीका झाली होती.

​आता थेट स्वातंत्र्यदिनी कुटुंबासह टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.एका लोकप्रतिनिधीनेच पोलीस प्रशासनाविरोधात असा गंभीर आरोप करत आत्महत्येचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

​या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या धमकीची गांभीर्याने दखल घेत पोलीस प्रशासन किशोर मासाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. या घटनेमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *