बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असतानाही, या संपूर्ण काळात नगरपरिषदेच्या केवळ दोनच सर्वसाधारण सभा झाल्या असून स्थायी समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तातडीने आयोजित करावी, अशी मागणी बारामती नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सभेअभावी विकासकामांना खीळ व नागरिकांची नाराजी
निवेदनात नमूद केल्यानुसार, लोकशाही व्यवस्थेत सर्वसाधारण सभा हे धोरणात्मक निर्णय घेणारे आणि नागरिकांचे प्रश्न मांडणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र सभा नियमित होत नसल्याने पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, पथदिवे, वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत. नगरसेवकांना सभागृहात प्रश्न मांडता येत नसल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी बारामतीला विकासाचे आदर्श मॉडेल बनवण्याचे स्वप्न पाहिले होते आणि अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या होत्या. मात्र सध्या अपेक्षित गतीने काम होत नसल्याचे दिसून येत असून, अनेक भागांत अस्वच्छता, अव्यवस्था आणि बकालपणा वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही प्रमुख व्यक्तींकडून सभा जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याची शंकाही नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
मागील सभेतील इतिवृत्ताबाबत गंभीर आक्षेप
मागील सर्वसाधारण सभेत २४ नगरसेवकांनी सुमारे ४० विषयांवर हरकती, सूचना आणि दुरुस्त्या सुचवल्या होत्या. सभागृहातील चर्चेनुसार इतिवृत्तात अपेक्षित बदल होणे आवश्यक असताना, आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही तसेच दुरुस्त केलेले इतिवृत्त (प्रोसिडिंग) नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. कामकाजातील पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींच्या अधिकारांच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
राजकीय संघर्ष नको, पारदर्शक व लोकशाही पद्धतीने कामकाज व्हावे‘
”बारामती शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा राजकीय संघर्ष करायचा नसून शहराचा विकास व्हावा, नागरिकांचे प्रश्न सुटावेत आणि नगरपरिषदेचे कामकाज लोकशाही व पारदर्शक पद्धतीने चालावे, एवढीच आमची प्रामाणिक भूमिका आहे,” असे नगरसेवकांनी निवेदनाच्या शेवटी स्पष्ट केले आहे. सभा वारंवार लांबणीवर पडल्यास प्रश्न अधिकच प्रलंबित राहतील, त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे
