बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ( संपादक : विकास कोकरे )
बारामती-भिगवण रोडवरील सावळ गावच्या हद्दीत असलेल्या ‘शिवन्या लॉज’मध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत पर्दाफाश केला आहे.दि.२३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून हा छापा टाकला.याप्रकरणी लॉज चालक,मॅनेजर आणि साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना,भिगवण रोडवरील सावळ येथील ‘शिवन्या लॉज’मध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तातडीने एक बोगस ग्राहक (डमी कस्टमर) लॉजवर पाठवला. खात्री होताच सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान लॉजमधील मॅनेजर आदित्य पांडुरंग पवार (वय २२, रा.प्राथमिक शाळेजवळ, वंजारवाडी, ता. बारामती) आणि साफसफाई कामगार महंमद नजीर शेख (वय ५४, सध्या रा. शिवन्या लॉज,सावळ; मूळ रा. उस्मानाबाद) हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची सखोल चौकशी केली असता, लॉजचा मालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्या सांगण्यावरून बाहेरून महिलांना बोलावून, त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची कबुली त्यांनी दिली.
या छाप्यात पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील एका २६ वर्षीय पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. तिन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून पीडितेला पैशांचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव वसंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत.
