बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
३ ऑगस्ट २०२६ : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व गुंतवणुकीवर दरमहा १० ते १५ टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ₹२२ लाखांची कथित फसवणूक झाल्याप्रकरणी बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारामती शहर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात रणजित बाळासो शिंदे (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली होती,तर कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे , दोघेही रा. डोर्लेवाडी, ता. बारामती यांना आरोपी करण्यात आले होते
फिर्यादीनुसार, आरोपींनी “बिगबुल ट्रेडिंग” या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा सुमारे १० टक्के परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी करारनामा करून फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीला विविध बँकांकडून व नातेवाईकांकडून कर्ज घेण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार फिर्यादीच्या बँक खात्यातून, त्यांच्या पत्नीच्या खात्यातून तसेच बजाज फायनान्स आणि इतर वैयक्तिक कर्जांच्या माध्यमातून एकूण ₹२२,००,०००/- रक्कम आरोपींच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काही महिन्यांत काही रक्कम परत करण्यात आली; मात्र त्यानंतर मूळ गुंतवणूक आणि परतावा देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीने न्यायालयात नमूद केले आहे.या संदर्भात फिर्यादीने यापूर्वी बारामती शहर पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत बारामती न्यायालयात अर्ज दाखल केला.
अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ.सुरेखा पाटील यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यास आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२० तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम (MPID Act) कलम ३ व ४ अन्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून कायद्यानुसार पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात फिर्यादी यांच्या वतीने ॲड. तेजस चिरमे, ॲड. चैतन्य पवार व ॲड. चैतन्य दीक्षित यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले व फिर्यादीची बाजू प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडली.
या प्रकरणाच्या निमित्ताने नागरिकांनी अवास्तव किंवा हमखास परताव्याचे आश्वासन देणाऱ्या ट्रेडिंग योजना, अनधिकृत गुंतवणूक योजना किंवा खाजगी व्यक्तींच्या आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये, तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था व योजनेची वैधता तपासूनच निर्णय घ्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
संपादक : विकास कोकरे (8600385561,8600108188 )
