कुरवली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विद्या प्रतिष्ठान कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत कर्मयोगी शंकरराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, कुरवली, ता. इंदापूर, जि. पुणे येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी भ्रमणध्वनी, समाजमाध्यमे, ऑनलाइन शिक्षण तसेच डिजिटल व्यवहारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. त्याचबरोबर वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित डिजिटल व्यवहारांची माहिती देणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविणे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, बनावट संकेतस्थळे, संशयास्पद दुवे, फसवे दूरध्वनी व संदेश, एकदाच वापरला जाणारा संकेतांक, गोपनीय संकेतशब्द, समाजमाध्यम खात्यांची सुरक्षितता, क्यूआर संकेताद्वारे होणारी फसवणूक, बनावट ऑनलाइन आमिषे तसेच आर्थिक फसवणुकीचे विविध प्रकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या. अनोळखी व्यक्तींच्या दूरध्वनीवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद दुव्यांवर क्लिक करू नये, एकदाच वापरला जाणारा संकेतांक किंवा गोपनीय क्रमांक कोणालाही सांगू नये, समाजमाध्यमांवर वैयक्तिक माहिती प्रसारित करताना काळजी घ्यावी आणि कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी त्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले.तसेच “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” हा संदेश देत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
फसवणूक प्रतिबंधक अॅपचे विद्यार्थ्यांकडून सक्रियकरण:
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी फसवणूक प्रतिबंधक अॅपबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये या अॅपचे सक्रियकरण करून देण्यात आले तसेच त्याचा वापर आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणे पुरेसे नसून त्याचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या जनजागृती उपक्रमाला कर्मयोगी शंकरराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद आणि इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून सत्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला.सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक असून, “सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे”, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जाणीव निर्माण करून त्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनविणे हा आहे.
