बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ( संपादक : विकास कोकरे )
मुलगा हवा या हव्यासापोटी इच्छेविरूद्ध गर्भपात घडवून आणल्याचा तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू, दीर आणि जाऊ अशा चौघांविरूद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी मुस्कान वसीम मुलाणी (वय २७, सध्या रा.भांडुप पश्चिम,मुंबई; मूळ रा.जळोची, ता. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ८९, ८५, ८६,११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीतील माहितीनुसार,फिर्यादीस पहिली मुलगी असल्याने गर्भातील बाळाची लिंगतपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात करण्याचा आग्रह पती वसीम मुबारक मुलाणी,सासू ,दीर आणि जाऊ हे धरत होते.यास फिर्यादीने विरोध केल्यानंतर तिला मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली.
१८ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री साडेनऊ वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२५ च्या दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत बारामती बस स्टँडच्या पाठीमागील डॉ.सतीश व्ही.देवकाते यांच्या रुग्णालयात नेऊन फिर्यादीचा इच्छेविरूद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अपघातात गर्भपात झाल्याचे सांगून माहेरच्यांची दिशाभूल केल्याचे आणि पुढील काळातही छळ सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक सोनम जगताप करत आहेत.
