BIG BREAKING | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व महिला सन्मान पुरस्काराकडे शासकीय यंत्रणेची पाठ…


गटविकास अधिकाऱ्यांचे ‘जिओ टॅगिंग’ अहवालाचे आदेश!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

३१ मे रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी केली जाते. तसेच शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानुसार या दिवशी प्रत्येक गावातील दोन कर्तृत्ववान महिलांना ‘पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविणे बंधनकारक आहे.मात्र,बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आस्थापनांनी यावर्षी या शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत जयंती साजरी केली नाही, तसेच महिलांना पुरस्कारापासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे बारामती तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून शासकीय यंत्रणेच्या या मनमानी कारभारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या गंभीर विषयावर कोराळे खुर्द येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सूरज दत्तात्रय खोमणे यांनी आक्रमक भूमिका घेत बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) लेखी तक्रार दाखल केली आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि शासन आदेश पायदळी तुडवणाऱ्या ग्रामसेवक, मुख्याध्यापक व जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांचे कडक पाऊल; ‘जिओ टॅगिंग’ फोटोसह अहवाल सादर करण्याचे आदेश

माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज खोमणे यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी, पंचायत समिती बारामती यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. केवळ पोकळ खुलासे न स्वीकारता, या वर्षी ३१ मे रोजी केलेल्या कार्यक्रमांचे थेट पुरावे म्हणजेच ‘जिओ टॅगिंग फोटो’सह (Geo-tagged photos) चौकशी अहवाल त्वरित सादर करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अहवाल सादर करताना अनेक कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जनतेमध्ये तीव्र संताप; हलगर्जी करणाऱ्यांवर बडग्याची मागणी

शासनाचे स्पष्ट परिपत्रक आणि कोट्यवधी जनतेचे भावनिक अधिष्ठान असतानाही, तालुक्यातील जबाबदार अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक या विषयाकडे जाणीवपूर्वक ‘काळा डोळा’ करत हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र आहे. महिलांच्या सन्मानासाठी असलेल्या शासकीय योजना गावोगावी न पोहोचवणे हा थेट शासनाचा आणि कर्तृत्ववान महिलांचा अपमान असल्याचा सूर जनतेत उमटत आहे..
“महापुरुषांच्या जयंत्यांबाबत उदासीनता दाखवणाऱ्या आणि महिला सन्मान पुरस्कारांचे वाटप न करणाऱ्या अशा बेजबाबदार शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर तात्काळ कठोर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे,” अशी आग्रही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज खोमणे यांच्यासह बारामतीतील जनतेमधून केली जात आहे. आता या चौकशीत कोणकोणत्या ग्रामपंचायती आणि शाळा दोषी आढळतात आणि त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *