BIG BREAKING | अंधश्रद्धेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक; भोंदूबाबा अब्दुल हलीमच्या ‘मायाजाला’ची चौकशी करण्याची मागणी…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

घरगुती आणि व्यावसायिक अडचणी दूर करण्याचे खोटे आमिष दाखवून,अंधश्रद्धेच्या नावाखाली एका महिलेची तब्बल साडेचार ते पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात उघडकीस आला आहे. अब्दुल हलीम नावाच्या एका परप्रांतीय भोंदूबाबाने हा काळा बाजार मांडल्याचे समोर आले असून,पीडित महिलेने व्हिडिओ बाईटद्वारे आपबिती कथन केल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.एकेकाळी अवघ्या ७,००० रुपये पगारावर इमामत करणाऱ्या या मौलानाकडे अवघ्या १० ते १२ वर्षांत आलिशान क्रिएटा गाडी, बंगला, फ्लॅट आणि मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी अशी कोट्यवधींची माया कुठून आली? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला
जात आहे.

धार्मिक स्थळाचा गैरवापर ?आणि ‘दरबारा’चा सुळसुळाट

मिळालेल्या माहितीनुसार,संशयित अब्दुल हलीम हा मूळचा परप्रांतीय असून तो बारामतीतील एका मशिदीत धार्मिक कामांसाठी आला होता.मशिदीतील धार्मिक कामांच्या माध्यमातून त्याने सुरुवातीला स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यानंतर दर्ग्याच्या पाठीमागील जागेत त्याने दर्ग्याच्या पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःचा बेकायदेशीर ‘दरबार’ भरवण्यास सुरुवात केली. “तांत्रिक मदत करतो”,”घरातील इडा-पिडा आणि वाईट शक्ती दूर करतो” अशा भूलथापा मारून त्याने अडचणीत सापडलेले व्यापारी,नागरिक आणि विशेषतः महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली.

दर्गा ते फ्लॅट ते निकुंज परिसर: दरबाराचे बदलणारे पत्ते

उघड्या जागेत काळी विद्या करण्यास अडचणी येऊ लागल्याने, अधिक पैसा कमवण्याच्या आणि गुप्तपणे काळेधंदे चालवण्याच्या उद्देशाने या भोंदूबाबाला मोरगाव रोडवरील उत्कर्ष सोसायटी परिसरात फ्लॅट मिळवून देण्यात आला.मात्र,या फ्लॅटवर संशयास्पद लोकांची आणि महिलांची सततची वर्दळ वाढल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी आणि विरोध दर्शवला होता. रहिवाशांच्या विरोधामुळे भोंदूबाबाने आपला हा अंधश्रद्धेचा बाजार फलटण रोडवरील ‘निकुंज’ परिसरात हलविल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे.

स्थानिक पाठीराखे कोण? ‘त्या’ बड्या नावांची चर्चा

हा संपूर्ण प्रकार केवळ एका भोंदूबाबाचा नसून,त्याच्या पाठीमागे बारामतीमधील काही स्थानिक पांढरपेशा कार्यकर्त्यांचे आणि आर्थिक हितसंबंध असलेल्यांचे मोठे नेटवर्क सक्रिय असल्याची चर्चा आहे.अब्दुल हलीम याला बारामतीत नेमके कोणी आणले? त्याला दर्ग्यात आश्रय कोणी दिला? याचे धागेदोरे आता समोर येऊ लागले आहेत. या काळ्या धंद्यात त्याला मदत करणाऱ्यांमध्ये दर्ग्यातील काही पुजारी/ ट्रस्टी,शहरातील एक मोठा काचेचा व्यापारी आणि पूर्वी एसटी पार्किंगशी संबंधित एका व्यक्तीचे नाव राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर स्वार्थासाठी या लोकांनी भोंदूबाबाला पाठबळ दिले का ? याची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अनेक पीडित भीतीपोटी पडद्यामागे

पीडित महिलेने धैर्याने समोर येत या भोंदूबाबाचे खरे रूप समाजासमोर आणले असले,तरी या ‘दरबारा’च्या जाळ्यात फसलेल्या शोषितांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.समाजातील बदनामी आणि भीतीपोटी अनेक पीडित महिला व नागरिक अद्याप समोर येण्याचे टाळत आहेत.मात्र,या प्रकरणाची व्याप्ती पाहता तपासाची चक्रे वेगाने फिरण्याची गरज आहे.

सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी

“एका सामान्य ७ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीकडे अवघ्या काही वर्षांत बंगला,फ्लॅट आणि महागड्या गाड्या येणे हे मोठ्या रॅकेटचे संकेत आहेत.या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक संघटना करणार आहोत.केवळ भोंदूबाबा अब्दुल हलीम याच्यावरच नव्हे,तर त्याला बारामतीत आश्रय देणाऱ्या,आर्थिक रसद पुरवणाऱ्या आणि या काळ्या कारनाम्यात मदत करणाऱ्या सर्व पडद्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.”

या प्रकरणाने बारामती शहरात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून, आता पोलीस प्रशासन यावर काय पावले उचलणार,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *