BIG BREAKING | मनोहर भोसलेला सहकार्य करणे दत्ताकला इन्स्टिट्यूटच्या रामदास झोळला भोवले ? तिघांविरोधात गुन्हा दाखल…


सोलापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर उर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्यासह इतर साथीदारांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, राजेंद्र गोकुळ हुबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा 23 एप्रिल 2026 रोजी दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष एसआयटी पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण 23 आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी 10 आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दत्तकला इन्स्टिट्यूटमार्फत पैशांची विल्हेवाट ?

पोलिसांच्या तपासानुसार,मुख्य आरोपी मनोहर उर्फ मामा भोसले याच्यावर अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोण्याच्या माध्यमातून अनेक पिडीतांची फसवणूक करून मिळवलेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. हा पैसा ‘दत्तकला इन्स्टिट्यूट’ या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दौंड-पुणे येथील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ यांच्या माध्यमातून पैशांची विल्हेवाट लावली जात असल्याचे तपासात समोर आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संस्थेशी संबंधित व्यक्ती तसेच आरोपीला मदत करणाऱ्या इतर साथीदारांचाही तपास करण्यात येत आहे..या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक करण्यात आली असून, दोघांनाही 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, दत्तकला इन्स्टिट्यूटमधील याप्रकरणाशी संबंधित रजिस्टर, संगणक व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, आर्थिक व्यवहारांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित आर्थिक गैरप्रकारांचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *