BREAKING NEWS | ​बारामतीत बनावट सिगारेटची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…


​बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क ( संपादक : विकास कोकरे )

बारामती शहर परिसरात बनावट आणि नामांकित कंपन्यांच्या नावाने डुप्लिकेट सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.श्रीराम नगर परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ११ लाख ३२ हजार रुपये किमतीचा बनावट सिगारेटचा साठा आणि पिकअप टेम्पो जप्त केला असून,​याप्रकरणी ‘अन्वेष आयपीआर सर्व्हिसेस’ चे डेप्युटी मॅनेजर योगेश वेदानंदसिंग तोमर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध कॉपीराईट अधिनियम १९५७ च्या कलम ५१ व ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.हुजेब फिरोज बागवान चालक ( रा.यादगार सिटी, हरीकृपानगर बारामती ) रयान अयुब खान (रा.हरीकृपानगर इंदापूर रोड, बारामती ) जाकीर अल्लाउद्दीन शेख (रा.अंधेरी रेल्वे स्टेशन,मुंबई) पप्पू निषाद (रा. महादेव मळा,बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत..

​गोपनीय बातमीवरून पोलिसांची कारवाई ​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर येथे एका टाटा कंपनीच्या कॅरी पिकअप टेम्पोमध्ये (क्र.MH 42 AQ 6617) नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटची वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक, तक्रारदार आणि पंचांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर पिकअप टेम्पो ताब्यात घेतला.​६ लाख ८२ हजारांच्या बनावट सिगारेट जप्त ​टेम्पोची पाहणी केली असता, त्यामध्ये ‘गोल्ड फ्लेक’ कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेटचे बॉक्स आढळून आले.तपासादरम्यान हे बॉक्स बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान गोल्ड फ्लेक रेड २,४०,००३ किमतीचे ५० बॉक्स, गोल्ड लाईट ४,४२,००० किमतीचे १३० बॉक्स,टाटा कॅरी पिकअप टेम्पो ४,५०,००० रुपये किमतीचा पिकअप (MH 42 AQ 6617) असा एकूण ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मुंबईवरून होत होता बनावट मालाचा पुरवठा

चालक हुजेब बागवान याच्याकडे चौकशी केली असता,त्याने हा माल रयान अयुब खान व जाकीर अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून मिळाल्याचे आणि पप्पू निषाद यांच्या टेम्पोतून आणल्याचे सांगितले. मुंबईतील अंधेरी येथून हा बनावट माल पुरवला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.​सदर कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानदेव शिरसागर,पोलीस हवालदार साबळे यांच्या पथकाने केलेली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *