महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायती मध्ये घडला आहे. सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही.या प्रकाराची तक्रार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
साकोलीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरशी येथे सोमवारी ११ वाजता सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आले. ते दारुच्या नशेत इतके तर्र होते की, खुर्चीवर बसल्या- बसल्या लोळू लागले. त्यातच ते बेशुद्ध झाले.
ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली.आता यांची वरिष्ठाकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना भेटून घटनेची माहिती दिली गेली आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले आहेत.