BIG BREAKING | शेअर मार्केटमध्ये परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक;बारामतीत ‘बिग बुल’ कंपनीसह एजंटांवर गुन्हा दाखल…


बारामती: महाराष्ट्र टुडे लाईव्ह ( संपादक : विकास कोकरे )

शेअर मार्केटमध्ये दरमहा १० ते १५ टक्के भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची लाखो-कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे.या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात ‘बिग बुल ट्रेडिंग कंपनी’सह त्यांच्या स्थानिक एजंटांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

​यांच्यावर झाला गुन्हा दाखल

​बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे आणि बिग बुल कंपनी यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी स्वतःला शेअर मार्केटमधील अत्यंत अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ आणि ‘सेबी’ (SEBI) मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचे भासविले होते. त्यांच्या या भूलथापांना बळी पडून अनेक नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या कंपनीत गुंतवली.

*असे दिले होते परताव्याचे आमिष*

​आरोपींनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा सपाटा लावला होता. शेअर मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १० ते १५ टक्के निश्चित परतावा (Fixed Return) मिळेल, अशी आश्वासने त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर,गुंतवणूकदारांची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील, ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आमची असेल आणि मुदत पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम परत केली जाईल,असे छातीठोकपणे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन केला.​सुरुवातीला काही महिने परतावा दाखवून नंतर गुंतवणूकदारांची मूळ रक्कम आणि परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली.

​ *पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे*

​गुन्हा दाखल होताच बारामती शहर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या हाती काही व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे करारनामे, बँक खात्यांचे व्यवहार, धनादेश (चेक), इलेक्ट्रॉनिक संदेश (मेसेज) आणि इतर तांत्रिक पुरावे लागले आहेत. यावरून हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​शहरात दाखल करण्यात आलेला हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१६ (२), ३१८, ३४० सह ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण (MPID) अधिनियम, १९९९ चे कलम ३ नुसार दाखल करण्यात आला आहे.

​ *गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन*

​या प्रकरणात बारामती शहर व परिसरातील आणखी अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी बिग बुल कंपनी किंवा संबंधित एजंटांकडे गुंतवणूक केली आहे, त्यांनी कोणत्याही भीतीपोटी मागे न राहता तक्रारीसाठी पुढे यावे,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

​ *तक्रारीसाठी काय सोबत आणायचे?*

संबंधित सर्व बाधितांनी आपले पुरावे आणि कागदपत्रांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

*तक्रार करताना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:*

​ओळखपत्र (पॅन कार्ड इ.) व पत्त्याचा पुरावा​बँक स्टेटमेंट,UPI व्यवहारांचे तपशील आणि धनादेश कंपनीसोबत केलेले करारनामे(Agreements)WhatsApp संदेश, ई-मेल आणि कंपनीच्या जाहिराती ​ट्रेडिंग कोर्स फी भरल्याबाबातच्या पावत्या,​गुंतवणुकीशी संबंधित इतर कोणतेही दस्तऐवज.

​सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *