BREAKING NEWS | सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी ? ऑडिओ व्हायरल..कारवाई होणार का ?


कथित आर्थिक व्यवहारातील ५० हजार रुपयांच्या उल्लेखाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल;चौकशीची मागणी

मोरगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क ( संपादक : विकास कोकरे )

बारामती तालुक्यातील ‘सुपा’ पोलीस ठाणे पुन्हा एकदा कथित आर्थिक व्यवहाराच्या चर्चेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वढाणे येथील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपींच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. यातील ५० हजार रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असलेली कथित मोबाईल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बारामतीच्या पश्चिम भागात सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कथित आर्थिक व्यवहाराच्या चर्चेने स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वढाणे येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात संशयित आरोपींच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या कारणावरून पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांचा दप्तरी एका पोलीस हवालदाराने, ‘साहेब थोड्या रकमेत ऐकणार नाहीत, त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील,’ अशा आशयाचे संभाषण केल्याचा दावा केला जात आहे.

या संभाषणाचे मोबाईलवर ध्वनिमुद्रण झाल्याचे सांगितले जात असून, संबंधित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या कथित प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते.

हवालदाराची मागणी की वरिष्ठांच्या नावाचा वापर?

या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून परस्पर पैशांची मागणी केली का, की या कथित मागणीमागे अन्य कोणाची भूमिका आहे, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कथित व्यवहाराची माहिती होती का, त्यांची संमती होती का, अथवा त्यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला का, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे.

केवळ सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आरोप सिद्ध होत नाहीत. मात्र, तक्रार अर्ज आणि कथित संभाषणातील दावे लक्षात घेता, या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता ध्वनिमुद्रणाची सत्यता, संभाषणातील व्यक्तींची ओळख आणि कथित आर्थिक मागणीचा संपूर्ण घटनाक्रम तपासणे गरजेचे आहे. तसेच याप्रकरणी जे दोषी असतील ते अधिकार्यात व कर्मचारी यांच्यावर खाते अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी सामाजिक स्थरातून होत आहे.

त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी

पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास टिकून राहण्यासाठी अशा प्रकारच्या आरोपांची पारदर्शक चौकशी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून किंवा आवश्यकतेनुसार त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. कथित ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करून सत्यता पडताळावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

दरम्यान,या वृत्तात नमूद केलेल्या आर्थिक मागणीच्या आरोपांची तसेच सोशल मीडियावर प्रसारित ऑडिओ क्लिपची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू आणि चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी याच विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची दैनिक लोकमतच्या वतीने संपर्क साधण्यात आला यावेळी संबंधित कर्मचाऱ्यावर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी बोलताना दिले. या प्रकरणाची सर्व प्रशासकीय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे. यामुळे यापुढील कालावधीत या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *