बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा.लि. बारामती आणि कामगार संघटना यांच्यातील वेतनवाढ कराराचा वाद चिघळला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेली वेतनवाढीची बोलणी अचानक थांबवून व्यवस्थापनाने अडमुठी भूमिका घेतल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याच्या निषेधार्थ २० ऑक्टोबर २०२६ पासून सर्व कामगारांनी कामावर असताना जेवण न करता शांततापूर्ण मार्गाने ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे.
वेतनवाढ कराराची मुदत संपून दोन वर्षे उलटली तरी मुख्य मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. चर्चेदरम्यान सहमती ऐवजी वेळकाढूपणा करण्यासाठी व्यवस्थापनाने हा विषय अप्पर कामगार आयुक्तांकडे वर्ग केला आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम असतानाही कामगारांना योग्य पगारवाढ नाकारली जात आहे. उलटपक्षी, युनियनच्या प्रतिनिधींवर खोटे आरोप करणे, कामगारांना कुप्पम (आंध्र प्रदेश) व फाझिलका (पंजाब) येथे बदल्या करण्याची धमकी देणे आणि पोलीस बळाचा वापर करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
याशिवाय मुख्य उत्पादनाच्या ठिकाणी कंत्राटी व ट्रेनी कामगारांचा वापर करून उत्पादनाचा दर्जा खराब केला जात आहे. तसेच बॉयलर, इलेक्ट्रिक मेंटेनन्स व रेफ्रिजरेशन यांसारखे महत्त्वाचे विभाग कंत्राटी पद्धतीवर चालवण्याचा डाव आखला जात आहे.कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि बोनस न देण्याविरोधात कामगारांनी आयुक्त व न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच नियम धाब्यावर बसवून अनेक अधिकाऱ्यांनाही कामावरून काढून टाकले जात आहे.
व्यवस्थापनाने अडमुठी भूमिका सोडून युनियनशी पुन्हा चर्चा करून मार्ग काढावा, असे आवाहन युनियनचे संस्थापक पांडुरंग कचरे,अध्यक्ष विजय सस्ते आणि सरचिटणीस राजेंद्र कोळेकर यांनी केले आहे. कामगारांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीबद्दल आभार मानतानाच, न्याय्य हक्कासाठी कायदेशीर लढा असाच सुरू राहील, असा ठाम निर्धार युनियनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
