Baramati | डॉ.विशाल मेहता व डॉ.निकिता मेहता यांना ‘आरोग्यरत्न पुरस्कार २०२६’


एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय व सामाजिक कार्याचा गौरव; ग्रामीण आरोग्यसेवेतील योगदानाची दखल

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती येथील मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. विशाल मेहता व डॉ. निकिता मेहता यांना वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आरोग्यरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. एबीपी माझाच्या वतीने मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या मेहता दाम्पत्याने २००८ मध्ये मर्यादित साधनसामग्रीत मेहता नर्सिंग होमची सुरुवात केली. रुग्णांचा विश्वास, परिश्रम आणि सेवाभावाच्या जोरावर आज या संस्थेचे रूपांतर अत्याधुनिक मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाले आहे.

एकाच छताखाली ३५ हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

आज रुग्णालयात एकाच छताखाली ३० हून अधिक वैद्यकीय विशेष विभाग आणि ३५ हून अधिक तत्पर तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली जात आहे. युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, डायलिसिस, ऑर्थोपेडिक्स, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅथ लॅब, प्लास्टिक सर्जरी तसेच विंका आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर अशा विविध सुपरस्पेशालिटी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय योजनांसह खाजगी विमा कंपनीच्या माध्यमातून कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत

‘ एक पेशंट, एक झाड’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धन

वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत मेहता दाम्पत्याने ‘एक पेशंट, एक झाड’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक प्रसूतीनंतर रुग्णाच्या कुटुंबाला एक झाड भेट दिले जाते. आतापर्यंत या उपक्रमातून १० हजारांहून अधिक झाडांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोफत वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून हजारो महिलांच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना महानगरांच्या धर्तीवर दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या कार्याची दखल घेत मेहता दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मेहता हॉस्पिटलच्या संपूर्ण टीम सह शुभचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

हा पुरस्कार केवळ एका दाम्पत्याचा सन्मान नसून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी समर्पित असलेल्या मेहता हॉस्पिटल परिवाराच्या कार्याची पावती मानली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *