बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर कठोर पाऊल उचलत त्याच्यावर एमपीडीए कायदा १९८१ अंतर्गत कारवाई केली आहे.गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही सुधारणा न दाखवणाऱ्या आरोपीला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुरेंद्र रवींद्र काजळे याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण तसेच बारामती परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरोडा,दुखापत,गंभीर दुखापत,विनयभंग व फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवत पुन्हा नव्याने गुन्हे करण्याचा क्रम सुरूच असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा,औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (MPDA) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. सर्व कागदपत्रांची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविले. बारामती तालुका पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार,पोलीस अंमलदार महेश बनकर स्थानिक गुन्हे शाखा आणि सागर देशमाने विकास खाडे बारामती तालुका पोलीस ठाणे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
