बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…( अक्षय थोरात )
“अजितदादा असते तर हा प्रश्न एका मिनिटात सुटला असता…” हे शब्द आहेत बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील संतप्त आणि हतबल झालेल्या ग्रामस्थांचे. सध्या संपूर्ण तालुक्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच, ग्रामीण भागात सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगने जनतेचे जगणे कठीण केले आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या मोक्याच्या वेळीच वीज गुल होत असल्याने, ग्रामस्थांमधून आता एकच टाहो फोडला जात आहे – “दादा, तुम्ही परत या!”
उकाड्याने हैराण,विद्यार्थ्यांचे नुकसान
मार्च महिना संपत आला असून उन्हाचा कडाका वाढला आहे. ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असतानाच वीज पुरवठा खंडित केला जातो. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि कष्टकरी शेतकऱ्यांना भीषण उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. अभ्यासाच्या वेळीच वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अंधारात मेणबत्ती किंवा कंदील लावून अभ्यास करण्याची वेळ मुलांवर आली आहे, मात्र संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
क्विक ॲक्शन’ घेणाऱ्या नेतृत्वाची आठवण
बारामती तालुक्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारे आणि प्रशासनावर वचक असणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख आहे. ग्रामस्थांच्या मते, दादा सत्तेत असताना किंवा सक्रिय लक्ष घालत असताना अशा समस्या उद्भवल्या की त्यावर ‘क्विक ॲक्शन’ घेतली जात असे. “दादांना ग्रामीण जनतेच्या समस्यांची जाण होती. अधिकाऱ्यांना जरब होती आणि कामात कसलीही दिरंगाई चालत नव्हती. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. अधिकारी कोणाचेही ऐकायला तयार नाहीत,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव ?
एकीकडे बारामतीचा विकास वेगाने होत असल्याचा दावा केला जात असताना,दुसरीकडे मूलभूत गरज असणारी वीज ग्रामीण भागाला वेळेवर मिळत नाही, ही शोकांतिका आहे.अनेक दिवसांपासून हे लोडशेडिंग सुरू असूनही वीज वितरण कंपनी किंवा स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नाहीये. उन्हामुळे हैराण झालेली जनता आता विचारत आहे की, ही व्यथा नक्की मांडायची कोणाकडे ?
दादांच्या परतीची साद
”दादा असते तर त्यांनी एका फोनवर हा लोडशेडिंगचा प्रश्न निकाली काढला असता,” असे बोलताना ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बारामतीकरांनी दिला आहे. सध्या मात्र ग्रामीण भागात एकच सूर उमटत आहे – ‘दादा, तुम्ही पुन्हा लक्ष द्या आणि आम्हाला या संकटातून सोडवा.’
