दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या महिला रुग्णाशी जवळीक साधत डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.तिच्यावर रुग्णालयात तसेच विविध ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याची तक्रार पिडीत महिलेने पाटस पोलीस ठाण्यात दिल्यानंतर डॉक्टरवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनिल नामदेव झेंडे (मुळ रा.दिवे ता.पुरंदर, सध्या रा.वरवंड ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरवंड येथे डॉ. झेंडे हा धन्वंतरी ॲक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक रुग्णालय चालवतो.झेंडे याच्या धन्वंतरी रुग्णालयामध्ये २१ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला उपचार घेण्यासाठी आली होती.तिला पाठीवर गाठ आलेली होती.आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला जवळ ओढत मिठी मारली.तिने आरोपीला ‘डॉक्टर तुम्ही असे काय करता ? मी माझ्या घरातील लोकांना सांगेल असे म्हणत त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने ‘मला तु मला आवडतेस.आपण दोघे बाहेर फिरायला जाऊ’,असे म्हणत पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला.
या महिलेने आरोपीच्या या मागणीला नकार दिला. आरोपीने त्यानंतर बळजबरीने तिला दवाखान्याच्या आतील खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर, या महिलेला ‘कोणाला सांगू नकोस. नाहीतर मी तुझी बदनामी करीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर, आरोपी डॉक्टरने १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.आरोपीने तिला धकमावत तिच्याकडे सोन्याचा हार मागितला.
पिडीत महिलेने भितीपोटी अडीच तोळ्यांचा सोन्याचा राणीहार घरात कोणास काही न सांगता त्याला आणून दिला.त्यानंतर, दहा दिवसानंतर सोन्याचा राणीहार परत मागितला.पण,डॉक्टरने हा सोन्याचा हार परत देण्यास नकार दिला.तिला वारंवार ‘तुला तुझा राणीहार पाहीजे असेल, तर तु माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव. अन्यथा मी तुझ्या घरच्यांना याबाबत सांगेन’अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक करून त्याला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.