BARAMATI NEWS |बारामतीत नामांकित बँकेत शाखाधिकाऱ्यांने केला कोट्यवधींचा अपहार;शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अमित प्रदीप देशपांडे (रा.सहयोग सोसायटी समोर,गुरुसदन हौसिंग सोसायटी,बारामती) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शाखाधिकाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँकेचे मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल (रा.कोर्टी रोड, परिचारकनगर,जि.सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी हे पंढरपूर बँकेच्या मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात.दरम्यान,बारामतीमध्ये भिगवण रस्त्यावर जळोची येथे एक शाखा आहे.त्या शाखेत अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करतात.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी ताळेबंद पत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचे त्यांना आढळून आले.त्यांनी फिर्यादीला तपासणीचे आदेश दिले.त्यानुसार तपासणी केली असता देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली.ती खरी असल्याचे भासवत बँकेत अपहार व अफरातफर केली. तसेच बारामती शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना २ कोटी ३० लाख रुपये परस्पर काढून ती धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली.बँक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी ३१ लाख रुपये काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली.

दरम्यान,धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे पाच बनावट ओडीटीडीआर खाते उघडून त्यातील ३ कोटी २३ लाख ७१ हजार ८९७ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये ८३ खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले.खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढले. १० ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढून त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले.त्याद्वारे ३७ लाख ५६ हजार ८०३ रुपये स्वतःसाठी वापरून बँकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये ३ कोटी १८ लाख ३७ हजार ४६४ रुपयांचा अपहार केला.अशी एकूण बँकेची ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार करत बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *