महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ…बारामती नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांनी केले एक दिवसीय काम बंद आंदोलन….


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

ठाणे महानगरपालिके मधील महिला अधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपरिषदेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने लाक्षणिक एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.

३० ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या श्रीमती कल्पिता पिंपळे, सहाय्यक आयुक्त, माजीवाडा प्रभाग या (सायंकाळी ५.३०) च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत होते. त्या दरम्यान तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे.

झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होत असल्याचे सांगण्यात आले.
एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेच्या वतीने या गुन्हेगारी कृत्त्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
सदर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपरिषदेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लाक्षणिक एक दिवसीय काम बंद आंदोलन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *