Harshwardhan Patil |अखेर हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणारच ! तुतारी हाती घेण्याबाबत मुहूर्त आला समोर…


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती.आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा घेतला होता या मेळाव्यात पितृपंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे वक्तव्य केलं होतं.अखेर पितृपक्ष संपताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्याबाबत वेगानं हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली.शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली.हर्षवर्धन पाटील उद्या इंदापूर मध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.या पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांच्या पक्षांतराबाबतची भूमिकी जाहीर करण्याची शक्यता आहे.मात्र हर्षवर्धन पाटलांनी भूमिका जाहीर करण्याअगोदरच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील तसंच मुलगा राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या स्टेट्सवर तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीचा फोटो ठेवत या पत्रकार परिषदेत काय होणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत…

महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची जागा सध्या वादाचा विषय ठरली आहे.या जागेवर भाजपच्या हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. अजित पवारांनी तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष किंवा तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला होता. पाटील यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र तुतारी की अपक्ष याबाबतचा निर्णय आपण पितृपंधरवडा संपताच घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी पुढील भूमिका काय असेल याचे संकेत दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *