BIG NEWS : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू ; विधानसभेआधी बिबट्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता..!!


जुन्नर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे आणि जुन्नरमध्ये सध्या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.एका महिन्यात एकाचा तरी बिबट्याच्या हल्ल्यात जीव जातोय.आता रस्त्यालगत वीट भट्टी कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.तेजेवाडी ओझर – लेण्याद्री (जुन्नर) येथील वीट भट्टीच्या परिसरातील उसाच्या शेतात ही घटना घडली. रुपेश तानाजी जाधव अस मृत्यू झालेल्या नऊ वर्षीय मुलांचं नाव आहे.यामुळे आता जुन्नरमध्ये सातत्याने होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे विधानसभेत बिबट्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय..

जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत वीटभट्टी कामगाराचा नऊ वर्षीय मुलगा रुपेश हा पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला असताना लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा-ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने आजोबांना न जुमानता मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले.ही घटना गावातील नागरिकांना समजले असता गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला याघटनेची माहिती दिली.

वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मुलाची शोधाशोध सुरु केली,एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाची बॉडी शेजारच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळाली.या शोधकार्यात वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांचे ३०-३५ वनकर्मचारी, रेस्कु टीम सदस्य यांनी गावातील इतर तरुणांच्या मदतीने राबविले.त्यानंतर मुलाची बॉडी शवविच्छेदनाकरिता जुन्नर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आली.यानंतर घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी भेट देत पाहणी केली.वनकर्मचारी यांना याघटनेविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले.नरभक्षक बिबट्याला पकडण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे,ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १० पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.(लगतच्या शिरोली गावहद्दीत २ पिंजरे यापूर्वीच कार्यरत होते काल रात्री लगतच्या परिसरातील विद्युत डीपी जळल्यामुळे व पावसामुळे तेथे विजपुरवठा खंडित होता.त्यामुळे घरामागे असलेल्या अंधारात ही दुर्दैवी घटना घडली.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत.पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या काळात यावर काहीतरी उपाययोजना होण्याची जुन्नरकरांना प्रतिक्षा आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *