आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद आणि खा. सुळेंच्या मार्गदर्शनात योग्य वाटचाल करण्याची युगेंद्र पवार यांची ग्वाही
बारामती :आदरणीय शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू केलेल्या स्वाभिमान यात्रेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. गावागावांत आधीपासूनच त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून जयघोषाने आसमंत दणाणून जात आहे.गेल्या सहा दशकांहून अधिक काळ आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभे असलेल्या या गावांतील नागरिकांशी भेटून आपल्याला आनंद वाटतो, त्यांच्याशी बोलताना साहेबांच्या संपूर्ण वाटचालीचा इतिहास डोळ्यांसमोर उभा असतो. साहेबांच्या धोरणामुळेविविध क्षेत्रात अनेक मान्यवर मंडळी नावारूपाला आली. अशा ठिकठिकाणी साहेबांसोबत राहीलेल्या ज्येष्ठ अनेक नागरिकांचा आशीर्वाद आणि पुढील वाटचालसाठी मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे, अशी भावना युगेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली.स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आपल्या बारामती तालुक्यात नवीन उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास थांबू नये, यासाठी सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली पवार चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने प्रयत्नशील आहे. आदरणीय पवार साहेबांनी बारामतीचा विकास करताना पायाभूत सुविधांसह शेती, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले आहे. दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी साहेबांनी डायनामिक्स डेअरीज लि. ही कंपनी बारामतीत आणली, याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले.यंदाच्या लोकसभा निवडणुकीला आपण सर्वांनी जशी एकजूट दाखवली आहे. तशीच एकजूट येत्या विधानसभेला दाखवून आदरणीय पवार साहेबांचा पुरोगामी विचार जपला पाहिजे.सध्याच्या राजकीय स्थितीत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची महाराष्ट्राला खरी गरज आहे. त्यासाठी एकत्र येऊन लढूया. बारामती तालुक्याने कायम सत्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इथे नकारात्मक विचारांना कधीही थारा मिळला नाही आणि भविष्यात सुध्दा मिळणार नाही, याची अवघ्या महाराष्ट्राला खात्री आहे, असेही ते म्हणाले.
महिलांना सर्व क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी आदरणीय पवार साहेबांनी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते अंमलात आणले. पवार साहेबांच्या आई शारदाबाई पवार यांच्या संस्कारांची शिदोरी घेउन पवार कुटुंबिय वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. बारामतीला त्यांनी देशभर लौकिक मिळवून दिला, याचा प्रत्येक बारामतीकरांना अभिमान आहे. साहेबांनी कायम पुरोगामी विचारांचा वारसा जपला. त्यामुळे त्यांच्या विषयी सर्व समाज घटकांमध्ये विशेष प्रेम व आपुलकी आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन पुरोगामी विचारांची लढणारे साहेब आपले प्रेरणास्थान आणि पाठीराखे आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा पुरोगामी विचारांनाच जनता साथ देईल, अशी खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नीरा नदीच्या दूषित पाण्याची पाहाणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याविषयी स्वतः साहेब आणि खा. सुप्रिया सुळे प्रयत्नशील आहेत; आणि तो विषय मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी दिला. शेती, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात आदरणीय पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. साहेबांची जिद्द, ऊर्जा आणि आत्मविश्वास आमच्या सारख्या तरुणांना काम करण्यासाठी बळ देतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी पवार साहेबांना पाठबळ द्यायला हवे. सर्वसामान्य जनतेवर मधल्या काळात दबाव होता. पण, आता नागरिक उत्स्फूर्तपणे भेटत आणि बोलत आहेत. त्यामुळे समाधान वाटते. तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष प्रयत्नशील राहील. गावस्तरावर छोटे-मोठे उद्योग उभारणीला प्रोत्साहन पुढील काळात देण्यात येईल. आपण सर्वांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून उद्योजक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा युगेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वाभिमान यात्रेच्या तिसऱ्या दिवशी युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यातील सावळ, जैनकवाडी, कटफळ, गाडीखेल, पाहुणेवाडी, शिरवली, शिरष्णे, कांबळेश्वर, सांगवी, लिमटेक या गावांना भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संपूर्ण दौऱ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. बापू जगताप, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, गौरव जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.