फोटो हटविला नाही,तर जनआंदोलन उभारण्याचा आदमापूरकरांचा व धनगर समाजाचा निर्धार….
आदमापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे )
उंदरगाव ता. करमाळा येथे एक आश्रम उघडून स्वतः दैवी अवतार व सद्गुरू बाळूमामांचा अवतार असल्याचा दावा करत सर्वसामांन्यापासून अगदी उच्चभ्रू लोकांची फसवणूक करून पैसे घेणाऱ्या स्वयंघोषित मनोहर ( मामा ) भोसले यांच्या विरोधात आता आदमापूर ग्रामपंचायतीने टोकाचं पाऊल उचललं असून,मनोहर भोसले हा सद्गुरू बाळू मामांच्या नावाखाली सर्व सामान्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मनोहर भोसले हा सद्गुरू बाळूमामांचा अवतार नसल्याचे व बाळूमामांच्या नावाखाली जी आर्थिक लूट करत आहे,ती थांबविण्यासाठी जाहीर निषेध पत्रक काढले होते,व त्याच अनुषंगाने मनोहर भोसले यांनी पत्रकार परिषद घेत,आपण बाळू मामांचा अवतार नसल्याचे देखील जाहीर केले होते,तसेच आपल्याला ते ज्ञात देखील असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
मात्र आता मनोहर भोसले यांचे एक एक कारनामे बाहेर येत असल्याने त्याच्या अशा कृत्यामुळे धनगर समाजातील एकमेव संत सद्गुरू बाळू मामांची जर बदनामी होत असेल तर,समस्त धनगर समाज गप्प बसणार नाही,सद्गुरू बाळू मामांनी आपल्या उभ्या आयुष्यात सर्वसामान्य लोकांकडून एक दमडी ही घेतली नाही,त्यांनी उभे आयुष्य लोकांसाठी वाहून घेतले होते,जर अशा सद्गुरूंची मनोहर भोसले सारख्या व्यक्तीमुळे नाहक बदनामी होणार असेल तर,सकल धनगर समाज गप्प बसणार नसल्याचा इशारा आदमापूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला असून,कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली,तसेच संतोष आयचीत निर्माता साजरी क्रिएटिव्ह प्रोडक्शन हाऊस मुंबई यांची ”बाळूमामांच्या नावानं चांगभल” या मालिकेतील सुरवातीस मनोहर भोसले यांचा फोटो दाखविला जातो,या फोटो बाबत मनोहर भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की,या मालिकेमुळे बाळूमामांचा भक्त परिवार मला बाळू मामांचा वंशज समजत असल्याचा दावा केला आहे.
तसेच मनोहर भोसलेंचा एक एक नवनवीन कारनामे बाहेर येत असल्याने ग्रामपंचायत आदमापूर यांनी मनोहर भोसले विरोधात निषेध ठराव केला असून,या मालिकेतील मनोहर भोसलेंचा फोटो मालिकेतून तात्काळ हटविण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायत आदमापूर यांनी मालिकेचे निर्माता संतोष आयाचित यांना केली आहे.जर मनोहर भोसलेंचा फोटो तात्काळ हटवला नाही,तर सद्गुरू बाळू मामांच्या भक्तांच्या आणि सकल धनगर समाजाच्या वाढत्या दबावामुळे आम्हाला मालिका बंद करण्यासाठी जनआंदोलन व कायदेशीर लढाई सुरू करावी लागेल अशा इशारा ग्रामपंचायत आदमापूर यांच्या वतीने “बाळूमामांच्या नावानं चांगभल”या मालिकेचे निर्माता संतोष आयाचित यांना देण्यात आला आहे.