बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे काही दिवसांपासून कऱ्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असताना महसूल व पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मागील अनेक वर्षापासून या परिसरातील कऱ्हा नदी पात्रातील वाळूचा लिलाव न झाल्याने वाळूची तस्करी ही मोठ्या प्रमाणावर होत आहे..मात्र मागील आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी खुले आम मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केलेला आहे.
वाळू व्यवसायिक आपली वाहने ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये येऊ नये यासाठी गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर करत असून,गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत आहेत त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील वाट लागलेली आहे..गावात बेकायदेशीर वाळू उपसा होत असून,मात्र महसूल,पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळू उपशाकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे…
कऱ्हा नदी पात्रालगत खासगी क्षेत्र असणाऱ्या काळकुटे हे आपल्या जमिनीतील वाळू मोठ्या प्रमाणात विक्री करत असून,याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.. वारंवार पुरावे देऊन कारवाई का केली जात नाही,असा संतप्त सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे..यामुळे आता तरी बारामतीचे कार्यक्षम तहसीलदार या शेतमालकावर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे…