दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाच्या उर्वरित रकमेचा चेक काढण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना दौंड नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना अभियंता व प्रकल्प सल्लागार अभियंता यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.ही कारवाई दौंड नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये केली.प्रधानमंत्री आवास योजना अभियंता विजय दिगंबर नाळे,प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन अभियंत्यांची नावे आहेत. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे…
तक्रारदार यांच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाची उर्वरित रकमेचा चेक काढण्यासाठी यातील प्रधानमंत्री आवास योजनेचा अभियंता विजय नाळे यांनी ५० हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते.तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता विजय नाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती ३० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यातील ऍडव्हान्स म्हणून १० हजार रुपये लाच स्वीकारली आहे.तसेच यातील प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप यांनी नाळे यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे.त्या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने,पोलीस अंमलदार रियाज शेख,सुरडकर,माने,चालक जाधव यांच्या पथकाने केलेली आहे..