बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बदलाचे संकेत मिळत आहेत. आपल्या कारकिर्दीत उसाला सर्वाधिक उच्चांकी ३४११ रुपये प्रतिटन असा दर देणारे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी वैयक्तिक अडचणीमुळे पदाचा राजीनामा दिला आहे.येत्या काळात माळेगाव कारखान्याची धुरा नविन चेहऱ्यावर सोपवली जाणार असल्याचे या निमित्तानं स्पष्ट झालं आहे.
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी जवळपास साडेतीन वर्षे कारखान्याची धुरा सांभाळली. आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.दुसरीकडे उपाध्यक्ष सागर जाधव यांनीही आपला एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिल्याचं जाहिर केलं आहे.त्यामुळे आता बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तावरे यांनी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.बाळासाहेब तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जवळपास १५ ते १६ वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील सत्ता स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब तावरे यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. त्यावेळी त्यांची नियुक्ती काही कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला केवळ दीड वर्ष कालावधी शिल्लक असताना अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर यापुढील अध्यक्ष कोण ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. माळेगाव साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मदननाना देवकाते,ॲड.केशवराव जगताप यांची नावे अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असल्याचे चित्र आहे.सोमेश्वर येथे साखर करखान्याच्या सभेत लवकरच कारखान्याचा अध्यक्ष बदलण्याची भूमिका अजित पवारांनी घेतली होती..मात्र आता तरी धनगर समाजाच्या संचालकांना अजित पवार चेअरमन पदाची संधी देणार का ? वारंवार धनगर समाजाची व्हाईस चेअरमन पदावर बोळवण केली जाते.यामुळे आता तरी धनगर समाजातील संचालकांना अजित पवारांनी संधी द्यावी अशी मागणी धनगर समाजातून होऊ लागली आहे…