BIG BREAKING : बारामती तालुक्यातील अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापा तब्बल ३३ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना ठोकल्या बेड्या..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात कऱ्हा नदी पात्रातून अवैध वाळू उपशावर सुपे पोलिसांनी धाड टाकण्यात आली आहे.या कारवाईत वाळूसह दोन ट्रक, स्विफ्ट कार असा ३३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी सुपे पोलिसांनी ट्रक चालक महेश राजेंद्र यादव ( वय ३१ वर्षे रा. मुरूम ता.उमरगा,जि.उस्मानाबाद ),चेतन मारूती वाबळे,वय २५ वर्षे ( रा.उरुळी कांचन ता. हवेली ), ट्रक मालक आकाश रावसाहेब व्यवहारे ( रा.लोणी काळभोर,ता. हवेली ) नामदेव पोपट वाघमोडे ( रा.उरुळीकांचन,ता. हवेली ) आणि वाळु भरून देणाऱ्या देवा जगताप ( रा. जळगाव ता.बारामती ) या पाचजणांवर भादंवि कलम ३७९, ३४ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९,१५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुपे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास काऱ्हाटी येथील कऱ्हा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे सुपे पोलिसांनी आपल्या पथकासह काऱ्हाटी गावातून जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसले.साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक लाईट बंद ठेवून संशयितरित्या येताना दिसले.पोलिसांनी हे ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये विनापरवाना वाळू नेली जात असल्याचे आढळून आले. संबंधित चालकाकडे विचारणा केल्यानंतर ट्रकमालक मागून येत असल्याचे सांगितले.त्यानुसार स्विफ्ट (क्र. एमएच १२ एनई ७८८१ ) कारमधून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ट्रकमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत ८० हजार रुपये किमतीची १० ब्रास वाळू, टाटा कंपनीचे दोन ट्रक (क्र. एमएच १२ डीजी ०४४२) आणि (क्र. एमएच १२ एनएक्स ३४३३), स्विफ्ट कार असा एकूण ३३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान,पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे, पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक फौजदार रविंद्र मोहोरकर, राहुल भाग्यवंत, अनिल दणाणे, संदिप लोंढे, सचिन दरेकर, तुषार जैनक, होमगार्ड दिपक धायगुडे, रविंद्र धायगुडे यांनी ही कारवाई केली.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *