बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरातील देसाई इस्टेट,अशोकनगर आणि क्रीडा संकुल परिसरात काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी सलग पंधरा ते अठरा घरांवर दरोडा टाकला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.त्यामध्ये अनेक घरामधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन नेल्याची माहिती समोर येत आहे.बारामतीत सध्या कायद्याचा धाक राहिला आहे की नाही ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.बारामती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक नेमकं कशा व्यस्त आहे ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. यामुळे बारामती शहरातील जुन्या शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांची पुन्हा शहरात नियुक्ती व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या घरांवर जर दरोडा पडत असेल तर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक नेमकं करतोय तरी काय ? अशी भावना बारामतीकरांकडून व्यक्त केली जातेय..या घटनेची माहिती समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बारामतीत प्रथमच अशा स्वरूपाची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाचवेळी एवढ्या घरांवर दरोडा पडण्याची बारामतीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचवेळी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शिळीमकर यांच्यासह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता.एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात घर फोड्या होत असताना गस्तीवरचे पोलीस नेमके कोठे होते ? व एवढ्या घरफोड्या झाल्यानंतर देखील कोणाला त्याचा कसा सुगावा लागला नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने तपास सुरु केला आहे.दरम्यान पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून चोरट्यांच्या गाडीचे व चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. ज्या फ्लॅटमध्ये घरफोड्या झाल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा फ्लॅट बंद अवस्थेतील आहेत. एकाच सदनिकेमध्ये जवळपास २० तोळे सोनं चोरीला गेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत काम करणाऱ्या जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांची उणीव शहर पोलीस ठाण्याला जाणवत आहे आणि अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आणावे अशी मागणी देखील बारामतीकरांकडून करण्यात येत आहे…
यामुळे आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन बारामती शहरातील काम करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना बारामती शहरात पुन्हा पाठवणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे