BHIGWAN CRIME : एटीएम सेंटरमध्ये गोड बोलून अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीला भिगवण पोलीसांनी घेतले ताब्यात;कारवाईत पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल केला जप्त…


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम सेंटरमध्ये नागरिकांना गोड बोलून फसवणूक करीत एटीएम कार्ड अदालबदल करुन लाखोंना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत भिगवण पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि विविध बँकांची तब्बल ५१ एटीएम कार्ड जप्त केली आहेत.अहमद इस्तियाक अली,वय.२७ वर्षे जैनुल जफरल हसन,वय.२८ वर्षे इरफान रमजान अली, वय.१९ वर्षे (सर्वजण रा.उत्तरप्रदेश ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात भा.द. वि.कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता…

याबाबत भिगवण पोलीसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार,१६ मार्च २०२३ रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास भिगवण पोलीस ठाण्यातील हद्दीत हिताची कंपनीच्या एटीएममध्ये हेमंत गोफणे पैसे काढण्यासाठी गेले असता एका अनोळखी इसमाने त्यांना मी पैसे काढून देतो असे सांगून ए.टी.एम कार्डचा पासवर्ड माहीती करून घेत हातचलाखी करत स्वतः जवळील बनावट ए. टी.एम कार्ड गोफणे यांना दिले. त्यानंतर या टोळीने ए.टी.एम कार्डव्दारे गोफणे यांच्या बँक खात्यातून १ लाख ३० हजार ३०० रूपये काढून घेतले. याप्रकरणी गोफणे यांच्या फिर्यादीवरुन भिगवण पोलिसात अज्ञाताविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भिगवण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ए.टी.एम मधील कॅमेरे,टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध लावत, आरोपींना मुंबई, ठाणे भागातून अटक केली. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने,पोलीसांनी आरोपीं कडून १ लाख ३० हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक MH.03 BC 6386 यासह विविध बँकांचे तब्बल ५१ एटीएम कार्ड असा एकूण ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद भोईटे,बारामती उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम,पोलीस अंमलदार सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने,हसीम मुलाणी,रणजीत मुळीक,होमगार्ड चांगन,पोलीस मित्र सुदाम पालकर यांनी केली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अमलदार महेश उगले हे करीत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *