बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे दोन दिवसीय बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा गावभेट दौरा करीत असताना, अचानकपणे शिवतारेंनी दौरा रद्द केला.अचानकपणे दौरा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते.परंतु याच बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा रद्द करत,याच दुष्काळी ६९ गावांच्या पाणी प्रश्नांसाठी मुंबईकडे धाव घेतली,आणि बारामती तालुक्यातील दुष्काळी गावातील लोकांना जानाई शिरसाई योजनेतून पाणी देण्याची पत्रकांद्वारे मागणी करत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली..
बारामती तालुक्यातील सुपे, कुतवळवाडी,बोरकरवाडी, राजबाग,भोंडवेवाडी,आंबी खुर्द खंडूखैरेवाडी,वढाणे, मांगोबावाडी चांदगुडेवाडी,दंडवाडी,नारोळी,कोळोली पानसरेवाडी,काळखैरवाडी,देऊळगाव रसाळ,खोर, उंडवडी सुपे,जराडवाडी,उंडवडी क.प.,सोनवडी सुपे बऱ्हाणपूर,गोजूबावी,कारखेल,जळगाव सुपे,अंजनगाव, साबळेवाडी,शिर्सुफळ गाडीखेल इत्यादी गावे ही जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्रात समाविष्ट आहेत.या गावांसाठी ३.४७ टीएमसी पाणी खडाकवासला धरण श्रृंखलेत राखीव आहे.दुर्दैवाने हा प्रकल्प सुरू झाल्यापासून आजतागायत पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात आले नाही.
मंजूर क्षमतेच्या केवळ २० ते ३० टक्के पाणी उचलण्यात आजपर्यंत जलसंपदा विभागाला यश आले आहे. महाविकास आघाडीच्या काळात बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.बंद जलवाहिनी केली तरी निर्धारित पाणीसाठा उचलण्यात यश न आल्यास या गावांना त्याचा उपयोग होणार नाही. मधल्या काळात शेतकऱ्यांना १९ टक्के दराने पाणी देण्याचा क्रांतिकारक निर्णय आपण घेतला पण पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.यात गंभीर बाब म्हणजे ज्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन केले जाते त्या बैठकीत या योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलावले देखील जात नाही.
साखर कारखाने व पाणीवापर संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावून पाण्याचे वाटप केले जाते.पण या दुष्काळी शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जाते.त्यामुळे अशा प्रकल्पांना पाणी वाटपात प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी पत्राद्वारे शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.अखेर बारामती तालुक्यातील दुष्काळी गावाच्या पाणी प्रश्नांसाठी शिवतारेनीं धाव घेतल्याचे दिसून आले.यामुळे आता शिवतारे यांच्या प्रयत्नांना यश येणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे…