BIG NEWS : जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे रोगराई आणि अपघाताचा धोका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भीती..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

जेजुरी रेल्वे स्टेशन समोर रेल्वे प्रशासनामार्फत ड्रेनेजचे काम सुरु आहे. ही ड्रेनेज लाइन १० फुट खोल व पुढे १५ ते २० फुटापर्यंत खोल होणार असून ते खुले राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.असे झाल्यास याठिकाणी असलेल्या लोकवस्तीत आणि स्टेशनवर येणाऱ्या भक्तांमध्ये रोगराई पसरण्याबरोबरच अपघात होऊ शकतात.अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार सुळे यांनी ही भीती व्यक्त केली असून ड्रेनेज लाईन बंदिस्त करण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जेजुरी येथील रेल्वे परीसरामध्ये तसेच रेल्वे वसाहतीमध्ये मोठी नागरी वस्ती आहे.।याठिकाणी खुले गटार होणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. डासांचे प्रमाण वाढून साथरोगांचेही प्रमाण वाढेल. इतकेच नाही, तर दहा ते पंधरा फुटांपर्यंत खोल असलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये लहान मुले किंवा प्रसंगी मोठी माणसे सुद्धा पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब सुळे यांनी निदर्शनास आणून दिली.

जेजुरी हे तिर्थक्षेत्र असून याठिकाणी खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्रांचे आराध्य दैवत असल्यामुळे महाराष्ट्रतूनच नाही, तर देशभरातून भाविक जेजुरीस मोठ्या प्रमाणात येत असतात. यात रेल्वेने येणाऱ्या भक्तांची संख्याही प्रचंड मोठी आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याशिवाय या परिसरातील शेतकरीही रेल्वे स्थानकावर आपल्या मालाची ने–आण करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. असे असताना त्या रस्त्यावर खुले गटार झाल्यास शेतकऱ्यांची वाहने या रस्त्यावरून येणे शक्य होणार नाही, तरी येथील ड्रेनेजलाईन बंदिस्त करण्यात यावी, अशा सूचना सुळे यांनी यावेळी दिल्या.

कोळविहीरे जेजुरी रस्यावरील भुयारी मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शिवाय हे काम करताना त्या ठिकाणी खड्डे केले असून ते सुद्धा अद्याप बुजवले नाही. वास्तविक हा स्थानिक नागरिकांचा नित्याचा रस्ता असल्याने अर्धवट काम आणि खड्डयांमुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. या ठिकाणी असलेले क्रमांक २२ ही बंद असल्याने नागरिकांना तब्बल ७ किलोमीटर इरका लांबचा फेरा घ्यावा लागत आहे, या बाबी लक्षात आणून देत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या.

भुयारी मार्गाजवळच महावितरण आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या गेल्या आहेत. या दोन्ही वाहिन्या कमी उंचीवरून गेल्या आहेत. तसेच महावीतरणची उच्चदाब वाहिनी सुद्धा याच ठिकाणाहून गेलेली आहे. या वाहिन्या दुसरीकडे हलविल्यास भुयारी मार्गाचे थांबलेले काम पूर्ण होऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन महावितरण आणि एमआयडीसी या तीनही संस्थानी समन्वयाने तोडगा काढून भुयारी मार्गाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *