बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी परिसरात कऱ्हा नदीपात्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर धडक कारवाई केली आहे.यामध्ये वाळूसह जेसीबी, ट्रॅक्टर,ट्रक अशी सात वाहने असा तब्बल ४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७९,३४ पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ नुसार नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मनोहर शामराव चांदगुडे (वय.४६ वर्षे (रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती),स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे,वय.२७ वर्षे (रा.आंबी खुर्द,ता.बारामती, जि.पुणे),विठठल तानाजी जाधव (वय २५, दोघे रा.आंबी खु,ता.बारामती), अमोल शंकर सणस,वय.४६ वर्षे, रा. उरूळीकांचन,ता.हवेली), महादेव बाळु ढोले (वय ३८ रा. मोरगाव, ता.बारामती),विकास बाबासो चांदगुडे,वय.३५ रा.चांदगुडेवाडी,ता.बारामती आणि तीन अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी परिसरातील कऱ्हा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांच्या पथकाने नदीपात्रात धडक कारवाई केली.त्यामध्ये जेसीबी,ट्रॅक्टर,डंपिंग ट्रॉलीसह मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांची चाहूल लागताच यातील काहीजण फरार झाले.दरम्यान, घटनास्थळी मनोहर चांदगुडे,स्वप्नील भोंडवे,विठठल जाधव,अमोल सणस,महादेव ढोले,विकास चांदगुडे यांना ताब्यात घेतले आहे.तर घटना स्थळावरून तीन ट्रक्टर ट्रॉली, दोन जेसीबी व एका ट्रकसह वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.