BIG BREAKING : बारामतीतील बोगस डाॅ कृष्णा जेवादेने व त्याच्या सहकाऱ्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेत केला महाप्रताप; पदोन्नतीच्या नावाखाली शिक्षिकेला घातला दहा लाखांचा गंडा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामतीमधील बोगस डॉक्टर असलेल्या राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावे घेत एका अपंग शिक्षिकेला पदोन्नती मिळवून देतो,असे सांगत तिची फसवणूक केल्याप्रकरणी दोघाजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणूक झाल्यानंतर या शिक्षिकेने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता.याप्रकरणी डाॅ. कृष्णा शेषराव जेवादे (रा. बारामती ) व सोमनाथ इंगळे (रा. सोमवार पेठ,फलटण,जि. सातारा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत महिला शिक्षिका स्मिता विश्राम वाघोले (रा.राऊ काॅलनी,काळेपडळ,हडपसर, पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,वाघोले या पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून २००१ पासून काम करतात. २०२१ साली त्या गुडघेदुखीवरील उपचारासाठी बारामतीतील विश्वजित हाॅस्पिटल येथे आल्या होत्या. तेथे डाॅ. कृष्णा जेवादे व त्यांचा कंपाऊंडर सोमनाथ इंगळे यांच्याशी त्यांची ओळख झाली. डाॅ. जेवादे यांनी त्यावेळी शिक्षिकेची विचारपूस केली. त्यांना अस्थिव्यंग असल्याचे डाॅ. जेवादे यांना समजले. त्याने तुम्ही अस्थिव्यंग असताना तुम्हाला शिक्षण प्रमुखपदी पदोन्नती कशी मिळाली नाही,माझी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी ओळख असल्याचे सांगत त्यांच्यासोबतचे फोटो दाखवले.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.पदोन्नतीसाठी पैसे द्या, मी तुमचे काम करतो, असे त्याने सांगितले. त्यापोटी दहा लाखाची मागणी केली. त्यापैकी सुरुवातीला तीन लाख रुपये फिर्यादीने फोन पे द्वारे पाठवले. डाॅ. जेवादे याने आणखी पैशाची मागणी केली. त्यानुसार इंगळे याला पुण्यात मनपा शाळेत पाठवत तेथे फिर्यादीकडून दीड लाख रुपये रोख घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जेवादे याने संपर्क करत तुमचे काम होत आले आहे, आणखी साडे पाच लाख रुपये लागतील असे सांगत त्यांना मुलाखतीसाठी बारामतीला बोलावले.

त्यावेळी फिर्यादीने आणखी साडे पाच लाखाची रक्कम रोख स्वरुपात दिली. दोन ते तीन महिन्यात काम होईल, काम झाले नाही तर पैसे परत करतो असे जेवादे याने सांगितले होते.पैसे देऊन बराच कालावधी लोटला तरी काम होत नसल्याने फिर्यादी यांनी त्यांना फोनवर संपर्क केला. त्यावर तुमची ऑर्डर तयार आहे, लवकरच ती मिळेल असे सांगत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा काही महिन्यानंतर त्याचा फोन लागणे बंद झाले. व्हाटस अपवर मेसेज केल्यावर तुमचे पैसे लवकरच देतो असे त्याने सांगितले. परंतु काम न करता फसवणूक केली.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.

बातमी चौकट :

कृष्णा जेवादे याच्यावर कोरोना काळात बारामती तालुका पोलीस ठाण्यात बनावट रेमडीसिव्हर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात देखील जेवादे व त्याच्या सहकाऱ्याचा शोध सुरू असून,त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहे.लवकरच त्याला अटक केली जाईल.

कुलदीप संकपाळ ( सहाय्यक पोलीस निरीक्षक बारामती पोलीस स्टेशन )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *