इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेली कोणतीही नोटीस कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले यांना प्राप्त झालेली नाही. तरीही काही स्थानिक वृत्तपत्र व टिव्ही चॅनलवर अपुर्ण माहितीच्या आधारे चुकीचे व बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करणेत आलेले आहे,अशी माहिती कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी रविवारी दिली.
ते पुढे म्हणाले की,याप्रकरणी संबंधितांनी अवाजवी व्याज आकारल्याने कारखान्याने न्यायालयात त्या विरोधात दाद मागितली आहे. मात्र सदर प्रकरणी यापूर्वीच तडजोड झाली असून, दि.२ डिसेंबर रोजी न्यायालयात झालेल्या तडजोडीवर अंतिम निर्णय होईल.
न्यायालयामध्ये दावा दाखल केलेल्या संबंधित पार्टीशी कारखान्याचा साखरे संदर्भात व्यवहार झाला होता,या व्यवहारापोटी कारखान्याने वेळोवेळी काही रक्कमा संबंधित पार्टीस अदा केलेल्या आहेत. मात्र मध्यंतरी पडलेल्या दुष्काळामुळे व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या. कर्मयोगी कारखाना हा सुमारे २५ हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे, त्यामुळे न्यायालयात कारखान्याने शेतकरी सभासदांच्या हिताची भूमिका घेतली.
संबंधित पार्टीने आवाजवी व्याज आकारल्याने कारखान्याने त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.साखर उद्योगांमध्ये न्यायालयामध्ये अशा प्रकारचे दावे असणे हा नियमित कामकाजाचा भाग समजला जातो. सध्याही राज्यातील विविध कारखान्याच्या संदर्भात असे शेकडो दावे न्यायालयात चालु आहेत. कारखान्यांशी संबंधित बहुतांशी दावे हे तडजोडीने निकाली निघत असतात. त्यानुसार कर्मयोगी कारखान्याच्या संबंधित दाव्यामध्ये मध्यल्या काळात संबंधित पार्टी बरोबर तडजोड झाली असून, दि.२ डिसेंबर रोजी न्यायालयातील सदर प्रकरणी तडजोडीवर अंतिम निर्णय होईल,असे लोकरे यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील साहेब तसेच पद्माताई भोसले यांना अशा प्रकारची कोणतीही न्यायालयीन नोटीस प्राप्त नसताना त्यांची तसेच कारखान्याची नाहक बदनामी झाली असून,यासंदर्भात बदनामीकारक वृत्त दिल्याने संबंधित वृत्तपत्र, चॅनल व बातमीदारांविरोधात वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा व अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याचेही कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.