पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत पुणे जिल्ह्यासह राज्यभरात समता पर्व साजरे करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली.
समता पर्वानिमित्त २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेत निबंध स्पर्धा,प्रश्नमंजुषा,लेखी परीक्षा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.२८ नोव्हेंबर रोजी ‘अधिकार व कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी पत्रकारांची कार्यशाळा, ३० नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर भिती पत्रक, पोस्टर, बॅनर्स व चित्रकला स्पर्धा, तसेच अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी कार्यकर्ता, प्रतिनिधी, कर्मचारी वर्गांची कार्यशाळा होणार आहे.
१ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा, २ डिसेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्त्यांना भेटी, ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी, वृद्ध यांच्यासाठी कार्यशाळा, ४ डिसेंबर रोजी स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत उद्योजगता विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे, ५ डिसेंबर रोजी संविधान जागर व महापरिनिर्वाण दिन अभिवादनात्मक कार्यक्रम, ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप, बक्षीस वितरण व समता पर्वाचा समारोप होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.