बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात अनेक भीषण प्रश्न आहेत.महागाई,बेरोजगारी वाढते आहे.राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. अतिवृष्टीने शेतकरी हवालदील झाला आहे. त्याला पिकविम्याचे पैसे, शासनाकडून मिळणे गरजेचे झाले आहे.हे सगळे सोडून अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तिचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये,असा सल्ला अजित पवारांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेला दिला.यावेळी बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बारामती हे विकासात पर्यटकांच्या बाबतीत अग्रेसर होत चालले आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर पवार म्हणाले की,उड्डाणपूल,पूल व अन्य कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. वास्तविक या कामांना विधीमंडळ सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. अशी कामे थांबवणे उचित नाही, हे मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक भेटीत सांगत आलो आहे. त्यांनी नवीन कामे सुरु करण्याबाबत आमचे दुमत नाही. परंतु मागील विकासाची कामे थांबवण्याचेही काही कारण नाही. सत्ता नेहमी बदलत असते. त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये, असे आवाहन त्यांनी केले. कोणाला किती निधी द्यावा याचा अधिकार राज्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून ते काम करत आहेत. आता त्यात काय योग्य- अयोग्य हे जनतेने ठरवावे, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी मला याबद्दल काही माहिती नाही, असे सांगितले. मी रोज वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतो. मध्यंतरी यासंबंधी बातम्या आल्यानंतर मी डाॅ. कोल्हे यांच्याशी बोललो होतो. आमचे सातत्याने बोलणे होत असते. परंतु सध्याच्या बातम्यांबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेवूनच मी बोलेन,असे देखील पवार म्हणाले.सावरकरांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत फूट पडेल असे वक्तव्य केले असले तरी जोपर्यंत राष्ट्रीय नेते शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीला यत्किंचिंतही धोका नसल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.सध्याच्या सत्ताधार्यांनी विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु व्हायला अजून अवकाश आहे. इतक्या लवकर मी अधिवेशनातील मुद्दे सांगू इच्छित नाही. मी सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेणार आहे. त्यात चर्चा करून मुद्दे ठरवले जातील. आत्ताच मुद्दे सांगितले तर बैठकीचे प्रयोजन काय? असा प्रश्न ते मला विचारतील, असे सांगत पवार यांनी अधिवेशनातील मुद्दे सांगण्यास नकार दिला.