पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील मे. मुकेश सुपर मार्केट येथे विमल पान मसाला,आर.एम.डी पान मसाला, व्ही. एन सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे १ लाख २० हजार १२९ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मालक मुकेश कुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा प्रतिबंधित पदार्थाची विक्री रोखण्यासाठी सदरची आस्थापना सिल करण्यात आली असून दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी बावधन येथील मे. नरेंद्र ट्रेडर्सचे मालक गोविदराम प्रजापती यांच्याकडून सुमारे २३ हजार ३५० रुपये किमतीचा साठा जप्त करून त्यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दिलेला आहे.

कोल्हापुर कार्यालयातर्फे कनार्टक येथून एमएच-१२-आरएन-१२७१ या वाहनातून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी सुमारे १८ लाख ७२ हजार १०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा तसेच ८ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे २७ लाख २२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे, कोल्हापुर येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.सांगली कार्यालयातर्फे मागील पाच दिवसात विविध सात ठिकाणावरून सुमारे १ लाख ७१ हजार ५१९ रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करुन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *