बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती लोकसभा मतदारसंघाचा सात-बारा कोणाच्या नावे नाही. हा सात-बारा जनतेच्या हाती आहे. माझी लढाई परिवाराशी नसून प्रवृत्तीशी आहे.येथे सर्वसामान्यांना दाबून टाकले जाते.सहकारी संस्थांवरील वर्चस्वातून अनेकांना त्रास दिला जातो.बारामतीतही बदल घडू शकतो. गेली तीन-चार पिढ्या एकाच कुटुंबाचे येथे राजकारण सुरु आहे. जनतेने ठरवले तर बदल नक्की होऊ शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नुरा कुस्ती होत असल्याची चर्चा व्हायची. गत निवडणूकीत आम्ही त्यांना घाम फोडला होता. यंदाही नुरा कुस्ती होणार नाही.परंतु आपण संकटात आहोत हे दिसले तर बारामतीकर कोणाच्याही पाया पडतील, भावनात्मक बोलून स्वतःकडे मतदान वळवतील.त्यात ते माहिर आहेत.
मी निर्भिडपणे टक्कर देणारा माणूस आहे.जनतेची इच्छा असल्यास, नेतेमंडळींनी आदेश दिल्यास बारामतीचे शिवधनुष्य पेलण्यास मी तयार आहे.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी शिवतारे बारामतीत आले होते.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण बारामती लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना शिवतारे म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी ३ महिन्यात घेतले ७५ मोठे निर्णय
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ३ महिन्यात ७५ मोठे निर्णय घेण्यात आले.
शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. परंतु सत्तेतून पायउतार झाले, तरी त्यांना ते शक्य झाले नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध आहे. मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना उपसा सिंचन योजनेला क्राफ सबसिडीचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनांच्या वीजेचा दर १.१६ पैशावरून ३.८९ पैसे असा तिप्पट केला गेला.परिणामी राज्यातील बहुतांश उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या होत्या. नवीन सरकार आल्यावर मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत हा निर्णय बदलायला लावत दुष्काळी भागातील योजनांना दिलासा दिला.बारामती मध्ये झालेल्या विकास कामासंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले की,बारामतीत कोट्यवधी रुपयांचा विकास कामांसाठी निधी आणला जातो,ही चांगली बाब आहे.
परंतु त्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे.पुरंदरमधून मी कसा निवडून येतो, अशी डायलाॅगबाजी अजित पवार यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाची जागा काॅंग्रेसला दिली. अन्य सहा पक्षांना एकत्र केले.माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत पराभव घडवून आणला.परंतु त्यांना लोकसभेला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही. मागच्यावेळी केलेली डायलाॅगबाजी त्यांनी आत्ता करून दाखवावी. त्यांना एवढा अहंकार आहे तर राज्यात आजवर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का करू शकले नाहीत, असा सवाल शिवतारे यांनी केला.अशा प्रवृत्तींना वेळ आल्यावर निश्चित गाडू असेही ते म्हणाले.
यावेळी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्याच्या शेवटी विजय शिवतारे यांनी बारामतीमधील भाजप कार्यालय देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आवर्जून भेट दिली यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी त्यांचं स्वागत केलं.यावेळी बारामती शहराध्यक्ष सतीश फाळके, कार्यालयीन मंत्री रघु चौधर,गोविंद देवकाते,संजय मांढरे, हनुमंत लकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.