BIG BREAKING : मी बारामतीचा बाप आहे.”तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार..असे म्हणत गोळीबार करणाऱ्या शुभम राजपुरे सह सात ते आठ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गणेश जाधव याच्यावर गोळीबार करत त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी संशयित आरोपी शुभम विकास राजपुरे व तुषार भोसले यांच्यासह अन्य आठ अनोळखींविरोधात भा.द.वि कलम ३०७,१४३,१४७, १४८, १४९ सह शस्त्र अधिनियम ३,२५, ४,२७ नुसार विविध कलमांन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी जाधव यांचे मित्र ऋत्विक जीवन मुळीक, वय.२१ वर्षे ( रा.कुंभारकर वस्ती, वंजारवाडी, ता.बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.रस्ता ओलांडताना दुचाकी घासून नेल्याच्या वादातून हा प्रकार घडला.३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली होती.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की,गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पेन्सिल चौक ते जळोची रस्त्यावरील चाय चस्का दुकानात फिर्यादी हा त्याचे मित्र तेजस पवार,स्वप्निल भोसले,रवी माने यांच्यासह गेला होता. चहा पिऊन तो रस्ता ओलांडत असताना ट्रिपल सीट आलेल्या फिर्यादीला दुचाकी घासून गेली.त्यामुळे फिर्यादीने अरे पुढे पाहून नीट गाडी चालवं, माणसांना मारतो का, अशी विचारणा केली. त्यावर दुचाकी वळवत आणत त्यावरील एकाने फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या मित्रांनी त्यांची सुटका केली, परंतु यावेळी मित्रांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तेजस पवार याच्याकडून दुचाकीवरून कट मारणारा मुलगा हा तुषार भोसले असून तो शुभम राजपुरे याचा साथीदार असल्याचे समजले.

या घटनेनंतर फिर्य़ादी मित्रांसह तेथून निघून गेले.काही वेळाने ही बाब गणेश जाधव याला सांगण्यासाठी ते भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते गणेश जाधव याला चाय चस्का दुकानासमोर घडलेली घटना सांगत असताना तेथे चार ते पाच दुचाकी आल्या. एका दुचाकीवर शुभम राजपुरे बसला होता. त्यांच्या हातात कोयते होते. शुभम याने तुषार भोसले याला, कोण आहे रे तो, मस्ती आलीय काय, मी बारामतीचा बाप आहे, साल्यांना ठोका असे म्हणाला. शुभम राजपुरे याने ‘तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत पैदा व्हायचा आहे’ असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनदा फायरिंग केले.

दुसऱ्या वेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली.या घटनेत गणेश जाधव हा खाली कोसळला.त्यानंतर आरडाओरडा करत दहशत निर्माण करत सर्वजण दुचाकीवरून निघून गेले. गोळीबाराच्या आवाजाने पेट्रोलपंपावरील लोकही पळून गेले होते.फिर्य़ादी व अन्य मित्रांनी जाधव याला रक्तबंबाळ अवस्थेत बारामती हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून,
शुभम राजपुरे, तुषार भोसले व त्यांच्या अन्य आठ साथीदारांनी मुळीक व जाधव यांच्यावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे.या घटनेतील मुख्य आरोपी शुभम राजपुरे व तुषार भोसले हे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *