बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित आणि मॅग्नेट सोसायटी च्या अधिकाऱ्यांनी शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि शेतकरी मार्गदर्शन यांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) हा अशियन डेव्हलपमेंट बँक आर्थिक सहाय्यित राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प नुकताच महाराष्ट्रात सुरु झाला आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामतीची “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून निवड करण्यात आली.शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान थेट बांधावर पोचविण्यासाठी आणि काढणीपश्चात होणारे नुकसान टाळून शेतमालाला अधिकचा बाजारभाव मिळवून देण्यासाठी शेतीमालाच्या मूल्यवर्धनाबाबतचा “सेंटर ऑफ एक्सलन्स” करार करण्यात आला.
मॅग्नेट सोबतच्या झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील तज्ञांमार्फत चांगल्या कृषी पद्धतीवर अवलंबित उत्पादन तंत्रज्ञान,काढणीपश्चात हाताळणी, उत्तम कृषी विषयक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी फायदा होईल. बाजार पेठेतील उत्पादन आणि उत्पादकता,नवीन तंत्रज्ञान,प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्यास मदत होईल.संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार याप्रसंगी बोलताना म्हणाले की कृषी विज्ञान केंद्र,बारामती मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे “सेंटर ऑफ एक्सलन्स” (भाजीपाला गुणवत्ता केंद्र) असून आपण निवडलेल्या केळी, पेरू, सफरचंद, संत्री, डाळिंब, चिकू, स्ट्रॅाबेरी, गोड संत्री, हिरवी व लाल मिरची भेंडी आणि फुलझाडे अशा पिकांवर लक्ष अधिक केंद्रित करता येणार आहे. याचा फायदा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी होणार असल्याचे स्पष्ट केले.
या सामंजस्य कराराबद्दल कृषी विज्ञान केंद्र, बारामती चे आभार आणि आनंद व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक तथा मॅग्नेट सोसायटीचे प्रकल्प संचालक, श्री. दीपक शिंदे म्हणाले की विविध नवीन तंत्रज्ञान, क्षेत्र भेटी, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकांमुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होईल या कारणाने शेती मधील उत्पादकते मध्ये १५-२०% नक्कीच वाढ होईल.कृषी विज्ञान केंद्र,बारामती सारख्या शेती तंत्रज्ञान विकासात अग्रणी संस्थेबरोबर करार करून मॅग्नेट सोसायटी सुद्धा शेती क्षेत्रातही विकास करण्यास कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले”.यावेळी बोलताना ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी अपेक्षा व्यक्त केली की मॅग्नेट सोसायटी आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचा शेती क्षेत्रातील अनुभव व कार्य देशातील शेतकऱ्यांना या सामंजस्य कराराने शेतीविषयक ज्ञानाचे नवीन दालन उघडेल आणि महाराष्ट्रातील प्रगत शेतीची गाथा सर्व देशात पोहचेल.
तसेच,हवामान बदलाने येणाऱ्या काळातील शेती अजून बिकट होत जाईल आणि त्यासाठी आपले शेतकरी तयार राहावेत, यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करतील. मॅग्नेट अंतर्गत बचत गट, शेतकरी उत्पादन कंपनी आणि विपणन विषयक क्षमताचा विकास यांना तांत्रिक मार्गदर्शन करून त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे नलावडे म्हणाले.मॅग्नेट प्रकल्पाचे समन्वयक तथा कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद जोशी याप्रसंगी बोलताना म्हणाले की ह्या प्रकल्पाद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणी, नवीन वाण प्रचलित करणे,क्षमता बांधणी प्रशिक्षणे, प्रात्याक्षिके, मूल्य साखळीचे तंत्रज्ञान, इ.साठी अनुदान देय आहे.पर्यावरणाचा समतोल राखून प्रगत तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादन कसे घ्यावे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली मार्फत तयार केलेली नियमावली भारतातील सर्व राज्यांत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
यावेळी आशियाई विकास बँकेचे मासिहीरो निशिमुरा (ग्रामीण विकास तज्ञ), मिशिगो कातागामी (नैसर्गिक संसाधने व कृषी तज्ञ), ब्र्यान्डो एंगल्स (पर्यावरण तज्ञ), राघवेंद्र नादुविनामनी (प्रकल्प विश्लेषक ), मॅग्नेट सोसायटीच्या सहायक व्यवस्थापक अश्विनी दरेकर, प्रकल्प अधिकारी यादव,रावसाहेब बेंद्रे तर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे,संतोष गोडसे, आशिष भोसले हे या प्रसंगी उपस्थित होते.