BREAKING NEWS : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी अंकित गोयल यांची नियुक्ती..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शासनाने आज राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. डॉ़ अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. डॉ. अभिनव देशमुख यांची सप्टेंबर २०१९ मध्ये कोरोना उद्रेक सुरु असताना पुण्यात बदली करण्यात आली होती. गेल्या २ वर्षाच्या काळात त्यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. अनेक गुंडांना तडीपार केले. गायक मुसेवाला हत्याकांडातील संशयित गँगस्टर संतोष जाधव व त्याच्या टोळीला गुजरातमधून पकडले. तसेच कुख्यात गुंड गजा मारणे याला साताऱ्यात अटक केली होती.

अंकित गोयल यांनी गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमकपणे राबविले. त्यांच्या कार्यकालात चकमकींमध्ये ५४ नक्षलवादी मारले गेले. त्यात २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार वरिष्ठ नक्षलनेता मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. याशिवाय ४४ जणांना अटक करण्यात यश मिळविले. १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. दुसरीकडे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार, स्वयंरोजगाराचा मार्ग प्रशस्त केला.

१६ आत्मसमर्पियांचा सामूहिक विवाह लावून दिला. दुर्गम भागातील लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी’ (पोलीस दादाची खिडकी) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची दखल घेऊन अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने गोयल यांना ‘लीडरशिप इन कम्युनिटी पोलिसिंग’ हा अवार्ड घोषित केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदा त्यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *