पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी मागवलेला ५ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा साठा जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १७) रोजी अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी – स्वीट हलवा (व्हानवटी), रिच स्वीट डिलाईट (ब्रिजवासी), स्वीट हलवा (ब्रिजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी व स्वीट हलवा या अन्न पदार्थाचे ६ नमुने तपासणीसाठी घेवून हा साठा जप्त केला.
हा गुजरात बर्फी अन्न पदार्थ पुणे शहरातील मे.अग्रवाल स्वीट मार्ट, बुधवार पेठ,मंडई,मे.कृष्णा डेअरी फार्म, मानसरोवर अॅनेक्स, कोंढवा बु.,मे.अशोक राजाराम चौधरी,गहुंजे,देहुरोड व हिरसिंग रामसिंग पुरोहित, बालेवाडी यांनी गुजरात व वसई (जि.पालघर) येथून मागविला असल्याचे आढळून आले.या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत असून या अंतर्गत १ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत मिठाईचे २८, खवा-२, रवा, मैदा, बेसन- १२,खाद्यतेल- ७, वनस्पती/घी- २, नमकीन- ३ व इतर अन्न पदार्थाचे १६ असे एकूण ७० अन्न नमुने विश्लेषणा साठी घेतले आहेत.तसेच खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्याचा पुनर्वापर केल्याचे आढळून आल्याने तीन ठिकाणी ४ लाख ५१ हजार ४०० रुपये किंमतीचा साठा, हिरवा वाटाणा- ३९ हजार ८०० रुपये, मिठाई- ६ हजार ७५० रुपये आणि घी /खवा १२ हजार ४०० रुपये असा एकूण ५ लाख १० हजार ४०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा.स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी स्पष्ट केले आहे.