BARAMATI NEWS : बारामती शहरातील व ग्रामीण भागातील ९० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यात व नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत ३० ते ३५ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत सुरक्षिततेचा उपाय म्हणून बारामती शहरातील ६८ व ग्रामीण भागातील २२ अशा एकूण ९० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

नीरा व कऱ्हा नदीला आलेल्या पूराने नदीकाठच्या नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषि सहायक व ग्रामसेवक यांनी सूरू करावेत अशा सूचना तहसिलदार विजय पाटील यांनी दिल्या आहेत. बारामती शहरातील पंचशील नगर येथील २५ कुटुंबाना समाजमंदिर येथे, खंडोबानगर येथील ४३ व जळगाव क. प. येथील २२ कुटुंबाना मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्या निवाऱ्याची व जेवणाची सोय प्रशासनाने केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून पुणे येथून आपत्ती व्यवस्थापन पथकाची मागणी करण्यात आली आहे अशी माहिती देखील तहसिलदार पाटील आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. अद्यापही नाझरे धरणाच्या पाणलोट सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असून नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *