बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क..
नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते.यात लेक किंवा सुनेचे लाड केले जातात.हे चित्र सर्वत्रच पाहायला मिळतात; पण बारामती तालुक्यातील माळेगाव मधील एका कुटुंबाने माणदेशी खिल्लार गाईचे केलेले डोहाळे जेवण कौतुकाचा विषय ठरला आहे.यावेळी गाईला पैठणी परिधान करून गायची मिरवणूक देखील काढण्यात आली.यावेळी भोजनाचा बेत देखील करण्यात आला होता.या कार्यक्रमाद्वारे धंगेकर व राणे कुटुंबाने समाजासमोर आदर्श निर्माण केला.
योगिता व नानासाहेब राणे (ता.नातेपुते,जि.सोलापूर ) यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास (रा.माळेगाव,ता.बारामती) जातीवंत खिल्लार गाईचे वासरु भेट दिले.या वासराची सोनिया व संग्राम धंगेकर,पती संग्राम,सासु मिना व सासरे सुर्यकांत धंगेकर (चोरमलेवस्ती कारखाना रोड माळेगांव) यांनी गाईची मुलीप्रमाणे जोपासना केली.तिचे हौसा असे नाव ठेवले.
नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती.तसेच विविध पदार्थांचे रुखवत तयार केले होते. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट दिली. तसेच परिसरातील अनेक विधवांना हळदीकुंकू लावून सुवासिनींचा मान दिला. यानंतर उपस्थित सर्वांना प्रितीभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.