बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरातील अशोकनगर भागातील बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वा तीन लाखांचे दागिने व सात हजारांची रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजारांच्या मालावर डल्ला मारला असून,अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३८०, ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी (दि.९) मध्यरात्री फिर्यादीच्या बंगल्यात ही घटना घडली. याप्रकरणी अशोक बबनराव गलांडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शनिवारी फिर्यादींचे कुटुंब जेवण करून झोपले.पहाटे सकाळी उठले असता, त्यांच्या बेडरुमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने,त्यांनी प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही.फिर्यादींचा नातू अर्णव हा घराबाहेर गेला. खिडकीचे ग्रील एका बाजूने काढलेले दिसल्याचे निदर्शनास आले.बेडरुमच्या दोन्ही लोखंडी कपाटातील कपडे व सामान असताव्यस्त पडलेले दिसले.यावेळी फिर्यादींच्या कुटुंबातील लोकांनी कपाट व लाॅकरची पाहणी केली असता त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये १ लाख २५ हजार रुपयांचे साडे तीन तोळ्यांचे गंठण, ५० हजार रुपयांचे दीड तोळ्याचे मिनी गंठण,३५ हजारांची सोन्याची अंगठी, १७ हजारांची लेडीज अंगठी, १८ हजारांचे कानातील टाॅप्स, ४० हजारांचा चांदीचा गणपती, ८ हजार रुपयांचा छोटा गणपती, पाच हजार रुपयांचा चांदीचा पेला,२ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट, ३ हजारांच्या चांदीच्या साखळ्या, ५ हजार रुपयांची चांदीची अत्तरदाणी,२ हजारांचे दोन करंडे, ७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ३ हजार रुपयांचे पैंजण, २ हजार रुपयांच्या वाट्या, चार हजार रुपयांची चांदीची नाणी, एक हजारांचे घड्याळ व सात हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले.याप्रकरणी या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दांडिले हे करीत आहेत.