POLITICAL NEWS : देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेवेळी राज्यपालांना भेटलेच नाहीत,राज्यपाल कार्यालयाने माहिती अधिकारात खोटी माहिती दिल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांचा दावा..!!


सोमेश्वरनगर / बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेसाठी व इतर कारणासाठी राज्यपालांना किती वेळा भेटले,अशी माहिती अधिकारातून मागवली असता देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटण्यासाठी आल्याची नोंद आढळत नाही,अशी माहिती राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो प्रसिद्ध होऊनही,राज्यपाल कार्यालयानं खोटी माहिती दिल्याचा दावा केला आहे.यादव यांनी १९ जून ते १ जुलै २०२२ दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवन येथे ज्या ज्या तारखेस आले होते ती तारीख तसेच राजभवन येथील भेटीच्या रजिस्टरमध्ये भेटीचे कारण व राज्यपालांना सादर केलेल्या कागदपत्रांची छायांकित प्रत मिळण्याची मागणी यादव यांनी केली होती.

मात्र या काळात देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटण्यासाठी आल्याची नोंद आढळून येत नाही अशी माहिती माहिती अधिकारातून यादव यांना देण्यात आली आहे.वास्तविक पाहता २८ जुन २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या विवीध वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर प्रसिद्ध झाल्या आहेत असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेटलेच नसल्याची खोटी माहिती दिली आहे.

यासोबतच राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते त्याची माहिती तसेच एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपाल महोदयांनी अदयापही त्यांच्याजवळच वैयक्तिक राखुन ठेवली असुन त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळच ठेवण्याची नेमकी त्यांना कशाची भिती आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.असे यादव यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *