इंदापूर / भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता पुत्राला खासगी सावकारांनी गहाण ठेवलेली जमीन पुन्हा मागितली असता,
शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात पाच खासगी सावकारांच्या विरोधात भा.द.वि.कलम ५०४,५०६,३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली विलास शिरसाट,वय.३५ वर्षे, वसंत ज्ञानदेव राजपुरे,वय.५० वर्षे,गणेश संत राजपुरे, वय.२४ वर्षे,रवींद्र बाळासो शिरसट,वय.३५ वर्षे, चौघेही ( रा. शेटफळगडे, ता.इंदापूर ) व प्रताप शिवाजीराव तावरे, वय.३५ वर्षे ( रा.माळेगाव ता. बारामती ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी शेतकरी प्रवीण दिलीप मुळीक, वय. ३० वर्षे ( रा.शेटफळगडे, ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ,इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील शेतकरी प्रवीण मुळीक यांनी आर्थिक अडचणीमुळे पाच संशयित आरोपींकडून १३ लाख रक्कम ही साडेतीन टक्के व्याजदराने घेतली होती.त्यानुसार शेतकरी मुळीक यांनी व्याजाच्या पैशाला तारण म्हणून वडिलोपार्जित असलेली गट नं. ४१ मधील ५५ आर गुंठे क्षेत्र व गट नंबर ५० मधील ४४ आर गुंठे क्षेत्राचे खरेदीखत करून दिले होते.फिर्यादींनी मुद्दल व व्याजाची रक्कम अशी तब्बल २१ लाख दिली होती.पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्याने फिर्यादींनी संशयित आरोपीकडे तारण म्हणून ठेवलेल्या शेतजमिनीची मागणी केली असता,संशयित आरोपींनी फिर्यादी प्रवीण मुळीक व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.