माळेगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील शिरवली गावातील निरा नदी पत्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोघांवर माळेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र ज्ञानदेव मदने,वय.३२ वर्षे,अनिल नारायण रावत,वय.४५ वर्षे दोघेही ( रा. शिरवली,ता. बारामती,जि. पुणे ) भा.द.वि. कलम ३७९ ,३४ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शंकर मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवली येथे पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस उपनिरीक्षक साळवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत निरा नदी पत्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाली असता,गुरुवार (दि.६) रोजी सायंकाळी नीरा नदीतून वाळू उत्खनन करून ट्रॅक्टर चालक राजेंद्र ज्ञानदेव मदने हा शिरवली गावातून खांडज शिरवली मार्गे येत असल्याचे दिसले असता, पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवत ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी केली असता, ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास चोरीची वाळू आढळून आली.पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाकडे अधिक विचारपूस केली असता,त्यांनी चोरीची वाळू मालक अनिल रावत यांच्या सांगण्यावरून निरा नदीपात्रातुन आणल्यासाजे सांगितले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, मालक फरार झाला आहे.यामध्ये पोलिसांनी तीन लाख रुपये ट्रॅक्टर क्र. MH.12.JA.2683 व डम्पिंग टेलर तसेच अंदाजे एक ब्रास वाळू अंदाजे ९ हजार रुपये किमतीची जप्त करण्यात आली.या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल तीन लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस निरीक्षक किरण अवचर,पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस कर्मचारी वायसे,ज्ञानेश्वर मोरे यांच्या पथकाने केलेली आहे.