JEJURI NEWS : जेजुरीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल अठरा तास रंगला मर्दानी दसरा सोहळा, रमणा डोंगरात पहाटे तीन वाजता झाली देवभेट..!!


जेजुरी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरणात मर्दानी दसरा साजरा झाला. बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेजुरीगडावरून सीमोल्लंघनासाठी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. यावेळी हजारो भाविकांनी खंडोबा देवाचे लेणं असणारा भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला. जेजुरी गडावर व सह्याद्रीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल १८ तास हा मर्दानी दसरा सोहळा रंगला.दसऱ्याच्या दिवशी पहाटे जेजुरी गडावर श्री. खंडोबा व म्हाळसादेवीचे घट उठवून महापूजा अभिषेक,महाआरतीनंतर जेजुरी देवसंस्थान आणि मानकऱ्यांच्या हस्ते जेजुरी गड,नगारखाना शस्त्रे आदींचे पूजन करण्यात आले.

सायंकाळी ६ वाजता देवाचे मानकरी पेशवे, माळवदकर, खोमणे आदींनी इशारा देताच दसरा पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडार गृहातील श्री. खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवून शाहीथाटात गडावरून हा सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेणं असणाऱ्या भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.यावेळी भंडाराच्या उधळणीमुळे संपूर्ण आसमंत सोनेरी झाला. जेजुरी गडाला प्रदक्षिणा होत असताना हजारो भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन फटक्यांची आतषबाजी केली.रात्री ९ वाजता खंडोबा देवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी वाजतगाजत निघाला.मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रमणा दरी-खोऱ्यात देवभेटीचा सोहळा सुरु झाला.

यावेळी हवाई फटक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मानाच्या आरशात देवभेट झाली. यावेळी सुमारे ५० हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.देवभेटीनंतर ऐतिहासिक पेशवे तलावाकाठी आपटे पूजन होवून समतेचे सोने लुटले गेले. जुनी जेजुरी, जेजुरीतील कैलास स्मशानभूमी, नगरपालिका, महाद्वार पथ मार्गे पालखी सोहळा नंदीचौकात आला. यावेळी रस्त्यावर सडा, रांगोळी घालून पालखी सोहळ्याचे औक्षण करण्यात आले. नंदी चौकात धनगर भाविकांनी पारंपारिक गीते गात व नाचत लोकरीची उधळण पालखीवर केली. वजनाने प्रचंड जड असणारी पालखी खांद्यावर पेलवत व मानवी साखळी करीत खांदेकरी पालखी घेऊन गडावर सकाळी साडे सात वाजता पोहोचले. जेजुरीगडावर लोककलावंतानी देवाचा जागर केला. उत्सव मूर्ती मंदिरात स्थापन करून रोजमुरा वाटून दसरा सोहळ्याची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *